जातीपाती पाळल्या जात असतील तर देश कुठे बदलला आहे? : नीलम माणगावे
सांगली / प्रतिनिधी
जातीपातीच्या तटबंदी पुन्हा घट्ट होत निघाल्या आहेत. आजही जातीपाती पाळल्या जात असतील तर देश कुठे बदलला आहे हे धुरीनांनी सांगावे? असा परखड सवाल प्रख्यात साहित्यिका नीलम माणगावे यांनी विचारला. आरग तालुका मिरज येथे मोहन लोंढे यांच्या “पीळ” या कवितासंग्रहाच्या प्रकाशनावेळी आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या.
पीएमश्री जि. प. मराठी मुलांची शाळा नंबर एक यांच्यावतीने दप्तराविना शाळा या योजनेअंतर्गत लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रसिद्ध कवी मोहन लोंढे यांच्या “पीळ” या कवितासंग्रहाचे प्रकाशन व या संग्रहावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना नीलम माणगावे यांनी जातीयवाद्यांच्या प्रतिगामी विचारसरणीचा खरपूस समाचार घेतला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, दलित आत्मकथने वाचून आम्हाला जातीयतेचे भान आले. न कळत्या वयात हातून झालेल्या जातीय प्रतिक्रियेचे दुःख होते. जात अजूनही संपली नाही याचे वाईट वाटते. जातीच्या तटबंदी अधिकच घट्ट होत जाताना लोंढे यांचा कवितासंग्रह आपण कोण आहोत हे न समजलेल्या ओळखलेल्या माणसाची व्यथा वेदना अधोरेखित करते त्यामुळे ही कविता महत्त्वाची आहे असे त्या म्हणाल्या.
अभिजीत पाटील यांनी समकालीन दूषित वातावरणात मानवतावादी विचारांची पखरण करणारा “पीळ” हा कवितासंग्रह महत्त्वाचा दस्ताऐवज असल्याचे नमूद केले. तर प्रसिद्ध समीक्षक गोमटेश पाटील यांनी समाजातील दुरावा आणि दरी कोणी निर्माण केली? ही दरी निर्माण करणाऱ्यांनी समाजात तिढा निर्माण केला. या तिढ्यानेच कष्टकऱ्यांच्या आतड्याचापीळ अधिक गुंतागुंतीचा व मजबूत होत गेला. ते तिढे उघडे पाडण्याचे काम “पीळ”हा कवितासंग्रह करतो असे गौरवोद्गार काढले. प्रख्यात विचारवंत प्रा. डॉ. नंदा पाटील यांनी, विशिष्ट समाजाने बहुजन समाजाचा मेंदू गहाण पडेल याची व्यवस्था केली आणि त्यातून जन्माला आलेला विषमतावादी विचार आजही मती कुंठीत करून ठेवत आहे. जातीचा विषाणू आजही संपलेला नाही. जातीने निर्माण केलेल्या दुःखावेदनेपासून माणसाची सुटका व्हावी अशी अपेक्षा हा कवितासंग्रह व्यक्त करतो. जाती जातीत स्वतःला वाटून घेणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांपुढे वैचारिक तिढे कसे सोडवावे याचा परिपाठ हा कवितासंग्रह घालून देतो असे मत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक वरिष्ठ मुख्याध्यापक हरिभाऊ गावडे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी मुलांना किमान भाषण, व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र यातला फरक कळावा व त्याचे सादरीकरण लक्षात यावे. ज्याचा उपयोग त्यांच्या वैयक्तिक गुणवत्ता वाढीसाठी होईल यासाठी सर्वतोपरी आम्ही प्रयत्न करत असतो, या प्रयत्नाचा भाग म्हणूनच हा कार्यक्रम आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. साहित्य सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवणारी ही जिल्हा परिषदेची एकमेव शाळा असेल असे मत सर्वच मान्यवरांनी व्यक्त करत. शाळेत घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी स्वामी विवेकानंद आर्टपॉवर संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या रंगभरण स्पर्धेत स्टेट स्तरावर पाच विद्यार्थी , स्कूलस्टेट स्तरावर पंधरा विद्यार्थी मुख्याध्यापक व कलाशिक्षक यांना कलाभूषण पुरस्कार तसेच शाळेला आदर्शकलाशाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल सुद्धा कौतुक मान्यवरांकडून करण्यात आले. आभार आंबेडकरवादी समीक्षक चंद्रकांत बाबर यांनी मानले. सूत्रसंचालन पूजा पाटील व निलोफर मुजावर यांनी केले. यावेळी झलकारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष, प्रकाशक शशिकला गावडे, सचिव अधिका बाबर, कवी महेशकुमार कोष्टी, राम शिंदे, उषा कांबळे, राजाराम सुतार, राजश्री कोष्टी, सुनिता मुंडे, सतीश कुंभार, आदिनाथ गायकवाड, वैशाली पाटील, नीलिमा शहा, दिलीप ओमासे, छाया ओमासे , जयश्री कोरे,विजय पाटील, दिपा पाटील, रुपाली पाटील, वसंती माळी, रुक्मिणी जाधव यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments