Type Here to Get Search Results !

मराठी मुलांची शाळा नं.१ चे तारांगण...(विज्ञान‌ लेख)शशिकांत डांगे✒️

 


 दोन महिन्यांपूर्वी एका सकाळी कामाच्या निमित्ताने मराठी मुलांची शाळा नंबर १ कवठे एकंद ता-तासगाव मध्ये जाण्याचा योग जुळून आला होता, माझं तसं गावात जाण्यायेण्याचं प्रमाण तसं कमीच !

लोकवर्गणीतून बांधलेली शाळा पाहिली, तीन मजली शाळा, शाळा पाहून मन भरून आलं, कारण याचं शाळेत माझंही पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण झालं होतं, 

शाळा पहात असताना माझं मन भूतकाळात कधी गेलं ते समजलंच नाही, तो त्याकाळचा व्हरांडा, पेन्शिलवर गुळभेंडीच्या झाडाचे भवरे विकणारी पोरं, आंब्याच्या कुया तासून बनवलेली पिपाणी वाजवणारी पोरं, गावातील मारुतीच्या देवळाजवळच्या अशोक वृक्षाची कोवळी पाने पुस्तकाच्या पानात ठेवणारी पोरं, शनिवारी मारुतीच्या फोटो समोर उदबत्ती नारळ आणून फोडून जोरजोरात मारुततुल्य वेगमं जितेद्रंयमं, स्तोत्र म्हणाणारी पोरं, आणी नारळ फोडुन झाल्यावर कळकाची पाटी घेवून गावात शेण गोळा करुन, आणून शाळा सारवणारी पोरं...!

पाढा चुकल्यावर गुरुजींच्या बुक्या बुक्या खाणारी पोरं,  खाकी चड्डी, पांढरा शर्ट ,आणी डोक्याला गांधी टोपी, काखेत मारलेली वायरची रेघारेघांची पिशवी, एका हातात शाईचा दौत आणी पिशवीत दप्तरा सोबत ठेवलेला टाक...! 

ती कौलारू शाळा, शाळेच्या भिंतीवरची चित्र, म्हैशी जनावरं धुणारा पानवठा आणी त्यांचं पानवठ्या वर घरकामासाठी पाणी भरणाऱ्या महीला, सगळं कसं आठवत गेलं, अचानक एक गीत कानावर आलं, एका ओळीत सर्व विद्यार्थी उभे होते,

"खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे...! 




आणी मी भानावर आलो...

पंचेचाळीस वर्षांचा कालावधी केंव्हाच उलटून गेला होता, शेणानं सारवलेल्या शाळांचे वर्ग व व्हरांडे चकचकीत फरश्यांचे बनले होते, तिथे स्लायडींग विंडोच्या खिडक्या दिसत होत्या, मुलांना रंगीबेरंगी बॅचेस आले होते, आमच्या काळी बसायला पोत्याची घडी असायची ती नामषेश झाली होती, प्रत्येक वर्गात पंखे लागले होते, ऑईल पेंटींगने भिंतीवर सप्तरंगाच्या छटा दिसत होत्या, मुलांना हात धुण्यासाठी ओळीने बेसिन लावलं होतं,

पंचेचाळीस वर्षात सारं कसं बदलून गेलं होतं, स्वप्नातलं सत्यात यावं असंच झालं होतं, 

शाळेचे मुख्याध्यापक मा.शिवाजीराव गायकवाड सर माझ्याशी बोलत होते, प्रत्येक वर्ग त्यांनी फिरुन दाखवले...

माझ्या मनाला खुप मोठेपणा वाटला , गायकवाड सर बोलले "आपणाला आता तारांगण पहायला जायचं आहे...

मी आश्चर्याने प्रश्नार्थकपणे विचारले " कुठे?

कारण मी मुंबईत एकदा तारांगण पाहीले होतं,

"अहो आपल्या शाळेत तिसऱ्या मजल्यावर आहे.

"या शाळेत आहे? माझा प्रश्र्न.

त्यांचं उत्तर "होय,

त्यानंतर आम्ही तिसऱ्या मजल्यावर गेलो...

काळ्या रंगात आरेखीत केलेलं तारांगण पाहून थक्कच झालो, 

त्यामध्ये अंतराळाचा वेध घेणारी छोटीशी दुर्बिन..

अंतराळ यात्रेकरू वापरतात तसा  अंतराळवीर पोशाख, साऱ्या ग्रहांची माहीती, स्थान वगैरे वगैरे मी भान हरपून पहात राहिलो,

त्यानंतर माझ्या मनात एका कवितेच्या ओळी आठवू लागल्या. 

"या वाऱ्याच्या बसूनी विमानी

सहल करुया गगनाची,

"चला मुलांनो आज पाहूया

शाळा चांदोबा गुरुजीची....

खरच हि शाळा, तो चांदोबा आणी आपल्यासोबत आहेत ते गुरुजी...

खरं म्हणजे हे ग्रहतारे ,ब्रम्हांड आणी लाखो प्रकाशवर्षे दुर दुर पसरलेल्या अथांग आणी अगणित असं पसरलेला युनिव्हर्स, गॅलक्सी, आकाशगंगा...

त्यांचा वेध घेणारं आधुनिक अवकाश तंत्रज्ञान आणी विज्ञान शास्त्र...

इसवी सन १६०८ मध्ये दुर्बिणीचा शोध लावण्याचे श्रेय हान्स लिपरशे यांना जाते, परंतु गॅलिलिओ गॅलिलीने त्याची रचना सुधारली आणि क्रांतिकारी खगोलीय शोध लावले. गॅलिलिओच्या चंद्र निरीक्षणांपासून ते नवीन ग्रहांच्या शोधापर्यंत, विश्वाबद्दलच्या आपल्या समजुतीत बदल करण्यात दुर्बिणीने महत्त्वाची भूमिका बजावली.

इसवी सन १६०८ ते जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप या प्रचंड शक्तीशाली व सर्वात महागडी टेलीस्कोपच प्रक्षेपण इसवी सन २०२१ ...

असे खुप मोठे असे विज्ञानाचे क्रांतीकारी बदल या जगाने पाहिले,

जगप्रसिद्ध नासाने हबल स्पेस टेलीस्कोप किंवा हबल अवकाश दुर्बीण अवकाशात २४/एप्रिल १९९० साली अवकाशात स्थापित केली , ती दृश्य प्रकाश आणि अवरक्त (इन्फ्रारेड किरणे) या प्रकाशाचे निरीक्षण करते. हबल स्पेस टेलीस्कोप हे पृथ्वीभोवती परिभ्रमण करते ,

ती पृथ्वीपासून सुमारे ५५० किलोमीटर वर स्थित आहे,

हबलची पृथ्वी भोवतीच्या एका परिभ्रमणाची वेळ ९५ ते ९६ मिनिटं इतकी आहे,अमेरिकेचे  खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांच्या नावावरून हबल टेलिस्कोप हे नाव देण्यात आलं( आधार-"The Space Telescope Observatory")

या दुर्बिनीच्या माध्यमातून आजपर्यंत ताऱ्यांचा जन्म किंवा मृत्यू म्हणजेच नेबूला यांचा अभ्यास व त्यांचे फोटो, लाखो व अरबो प्रकाशवर्षे दुरच्या आकाशगंगाचे फोटो, गुरु ग्रहांच्या वायूमंडलात प्रवेशणाऱ्या धुमकेतूच्या तुकड्यांचे निरीक्षण व फोटो, डार्क इनर्जीचे परिक्षण व सिद्धांत मांडता आले, पण हबल स्पेस टेलीस्कोपचे फोटो हि डोळ्याला दिसणाऱ्या प्रकाशाचे व लाखो प्रकाश वर्षे दुरचे फोटो हे काहीसे फिकट अथवा धुंदले असल्याने नासाने सर्वात शक्तीशाली व इन्फारेड तरंग लहरींचा किंवा धुलीकणातुन आरपार वेध घेणाऱ्या अशा आधुनिक शक्तीशाली जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपचं यशस्वी असं प्रक्षेपन केलं.... जेम्स वेब या खगोलशास्त्रज्ञांच्या नावावरून जेम्स वेब नाव या टेलीस्कोपला दिले.

अवकाशात २५ डिसेंबर २०२१ रोजी फ्रेंच गयानातील कौरो येथून एरियन ५ रॉकेटद्वारे जेम्स वेब प्रक्षेपित करण्यात आले. जानेवारी २०२२ मध्ये ते त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचले, सूर्य-पृथ्वी L2 लॅग्रेंज पॉइंटजवळील सौर कक्षा, पृथ्वीपासून सुमारे १.५ दशलक्ष किलोमीटर (९३०,००० मैल) अंतरावर जेम्स वेब दुर्बिन स्थापित करण्यात आली, दुर्बिणीची पहिली प्रतिमा ११ जुलै २०२२ रोजी लोकांसाठी प्रसिद्ध करण्यात आली. आता हे L2 स्थान नेमके कुठे असा प्रश्र्न आपल्यामध्ये निर्माण होईल, जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप हे पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत नसून ते पृथ्वीच्या कक्षे बाहेरुन किंवा पृथ्वी सोबत सुर्याभोवती परिभ्रमण करीत आहे तर हबल टेलीस्कोप पृथ्वीभोवती परिभ्रमण करते, हा फरक आहे, आता L2 स्थान कुठे आहे, तर एका ओळीत प्रथम सुर्य त्यानंतर पृथ्वी त्यानंतर जेम्स वेब आहे. सुर्य प्रकाशामुळे पृथ्वीची छाया पडते ते लंग्रेज पाॅइंट आहे ते जेम्स वेब टेलीस्कोपचं स्थान आहे  ते पृथ्वी चंद्राच्या अंतराच्या चारपट अंतरावर म्हणजे पृथ्वीचा केंद्र ते चंद्राचा केंद्र अंतर( आधार- टेक्स्टाईल डेल्टा  (॒ओप्लस एल) या मापकाच्या आधारे) २३९,००० मैल किंवा १.३ प्रकाश सेकंद असं खगोलिय पध्दतीचे मोजमाप आहे , यांच्या चारपट अंतरावर सुर्य ते पृथ्वी व तिच्या अंधकारमय ठिकाणी L2 या स्थानी जेम्स वेब स्थापित केले आहे, याच जेम्स वेब टेलीस्कोपनं  सुरुवातीला जेम्स वेब टेलीस्कोपचा फोटो नासाला पाठवला, तो स्मॅक्स 0723 या नावे नासाने प्रकाशित केला, ज्यामध्ये अगणित अशा ब्रम्हाडांचं दर्शन होतं, लाखो प्रकाशवर्षे दुरच्या हजारो गॅलक्सीच्या समूहाचा हा फोटो आहे.एका गॅलक्सीमध्ये लाखो आकाशगंगा तर करडो तारे आहेत, त्यानंतर

NGC3132 नेबुला हा ही फोटो नासाने प्रकाशित केला, नेबुला म्हणजे तारा फुटणे होय, तो नेबूलाचा फोटो  २५०० प्रकाश वर्षे दुर आहे. ज्याच्या अंतरामध्ये अनेक तारे ही दिसतात.

असे अनेक अवकाशातील ब्रम्हाडाच्या अस्थित्वाचे फोटो जेम्स वेब द्वारे नासाने आजपर्यंत प्रकाशित केले आहेत. ब्रम्हांडातील अनेक ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांचा ही शोध लावला असुन अनेक ग्रह अशा ताऱ्याभोवती हॅबीटेबल झोन मध्ये फिरतात ,हॅबिटेबल झोन म्हणजे योग्य तापमानाचं ठिकाण,

 जे ग्रह ताऱ्या जवळ असतात ते अतितप्त ठिकाणी असतात, उदा बुध शुक्र ग्रह हे अति तप्त झोनमध्ये असल्याने जीवसृष्टी तिथे नसते तर ताऱ्या पासून खुप दुर हे अतिथंड ठिकाणं असतं, गुरु शनि युरेनस नेपच्यून वगैरे ग्रह अतिथंड झोनमध्ये असल्याने जीवसृष्टी तिथेही नसते, आपली पृथ्वी व मंगळ हे ग्रह सुर्याच्या हॅबिटेबल झोन मध्ये सुर्याभोवती परिभ्रमण करतात तिथे योग्य तापमान असल्यान जीवसृष्टी वाढण्याचे संकेत मिळतात अपवाद मंगळ ग्रहाचा आहे तिथे जीवसृष्टी नाही, अशा अनेक ताऱ्यांचा व ग्रहांचा शोध जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपनं लावला आहे, अशा ताऱ्याभोवतीच्या हॅबिटेबल झोन मध्ये असणाऱ्या अनेक ग्रहावरती जीवसृष्टी असण्याचे संकेत मिळतात पण अजुन ते विज्ञानाच्या दृष्टीने सिध्द झाले नाही, पण तिथपर्यंत विचार करण्याइतपत किंवा नेण्याइतपत आपल्या पृथ्वीवरील मानव सिध्द झालेला आहे हे नक्कीच आहे, हे मानवाने शोध लावलेल्या विज्ञानाचे यश आहे, व आधुनिक तंत्रज्ञानाचे यश आहे, आज आपणाला वाचताना हा विषय थोडा जटील किंवा गुंतागुंतीचा वाटत असेलही पण तो माझ्या परीनं कुठेतरी सोपा करुन मांडण्याचा मी या लेखात प्रयत्न केला आहे,

खरं म्हणजे मी कवठे एकंद ता-तासगाव शाळेतील तारांगण पाहीले आणी मला वाटलं कि विज्ञाना बाबत काहीतरी लिहावं, मी कोणी खगोलशास्त्रज्ञ नाही किंवा या कोणत्याही प्रक्षेपण क्षेत्राचा आणी माझा कुठेही सहभाग नाही, किंवा माझी तशी शैक्षणिक पदवी ही नाही,  पण मी वाचकवेडा माणूस आहे, याबाबतीतलं खुप खुप वाचतो, अनेक शास्त्रज्ञांचे व्हिडीओचे कार्यक्रम पहातो, 

आज आपल्या भारतामध्ये अवकाश तंत्रज्ञान किंवा विज्ञानाला ,खगोलशास्त्राला दिशा देत असताना त्याची आवड, उत्सूकता,जिज्ञासू वृत्ती हि विद्यार्थ्याच्या मनात लहानपणापासून बिंबवली पाहीजे, छोट्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना विज्ञानाची आवड असणं गरजेचं आहे , या पृथ्वीतलावर विज्ञाना शिवाय दुसरं काहीही नाही हे निर्विवाद सत्य आहे हे दाखवून दिलं पाहीजे, तसेच आजपर्यंतच्या शिक्षणाच्या पध्दतीमध्येही अमुलाग्र बदल होवून त्या शिक्षणाची उंची वाढवणं गरजेचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना जो विषय आवडतो त्या विषयामध्ये टाॅपच शिक्षण विद्यार्थ्यांना लहानपणापासून मिळणं गरजेचं आहे, त्यासाठी त्याला प्रथमतः अवकाश तंत्रज्ञान, विज्ञान, तारा मंडल, आकाशगंगा, गॅलक्सी, युनिव्हर्स  दाखवलं पाहीजे तरच तो अशा विषयांना गवसणी चालेल, जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ आपल्या भारतात निर्माण करायचे असतील तर प्रथम शिक्षकांना सक्षम करुन आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण किंवा त्या विद्यार्थाला जे आवडतं ते शिक्षण अधिक प्रभावी करावे लागेल, विद्यार्थ्यांच्या मनात कल्पना शक्तीचा उदय कशाप्रकारे निर्माण होईल याकडेही लक्ष द्यावे लागेल. शेवटी गरज हि शोधाची जननी आहे, यासाठी टिमवर्क महत्वाचं आहे,

याबाबतीत मी एक उदाहरण देईन समजा आपण एखाद्या पाल्याला एखादा चित्रपट पहायला घेवून गेलो आणी त्यानं तो पुर्ण चित्रपट पाहील्या नंतर त्याच चित्रपटातील एखादा प्रसंग त्या पाल्याला विचारला तर तो पाल्य एकच प्रसंग न सांगता त्या चित्रपटातील आख्खा व प्रत्येक प्रसंग सांगेल, याचं कारण त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकानं व त्यांच्या संपूर्ण टिमनं तो चित्रपट बनवताना जी मेहनत घेतली आहे त्यांचं ते फलित आहे, ती मेहनत किंवा टिमवर्क आजच्या शिक्षण व्यवस्थेन, किंवा शिक्षणातील अभ्यासक्रमानं, किंवा त्या पाल्यांच्या पालकानीही घेणं गरजेचं आहे. कारण कोणतही टार्गेट ठेवायला लागेल तरच गौरवशाली यश व त्यातूनचा गौरवशाली इतिहास निर्माण करता येईल. इतकचं...


-शशिकांत डांगे✒️

8149790307




आजच आपली पुस्तके मागवा....


दर्जेदार पुस्तकांसाठी please visit : www. sahityakshar.com

https://www.amazon.in/dp/B0FCM5XRKT

https://www.amazon.in/dp/B0FCM72XPD

https://www.amazon.in/dp/B0FCM6BWHY

Post a Comment

0 Comments