प्रतिनिधी/पुणे
'विषमता संपली तर समतेसाठी चाललेल्या संविधान समता दिंडीची गरज उरणार नाही. विषमता असेल, तोपर्यंत समता दिंडीची गरज आहे. भविष्यात विषमता संपावी आणि संविधान समता दिंडी बंद व्हावी,' असे मत संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ महाराज चोपदार यांनी शनिवारी व्यक्त केले.
संविधान समता दिंडीचा प्रस्थान कार्यक्रम महात्मा फुले वाडा येथे झाला. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी अध्यक्ष अविनाश पाटील होते. परिवर्तनवादी कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे, ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या गीताली वि. म., गांधीवादी कार्यकर्ते अन्वर राजन,
राष्ट्र सेवा दलाचे माजी राज्य कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक, लेक लाडकी अभियानाचे प्रणव पवार, दिंडीचालक श्यामसुंदर महाराज सोन्नर, संयोजक विशाल विमल आदी उपस्थित होते.
'विचारांचा आदर करा'
'समाजात अनेक वेगवेगळ्या विचार प्रवाहांचे लोक आहेत. यामुळे आपण नेहमी इतरांच्या विचारांचा आदर केला पाहिजे,' असेही चोपदार म्हणाले. ....यवत ते वरवंड 'एक दिवस वारी'
गेल्या बारा वर्षांपासून 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत यंदा सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर यवत ते वरवंड मार्गावर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात चालणार आहे, अशी माहिती भारत घोगरे गुरुजी, वर्षा देशपांडे, महादेव पाटील यांनी दिली.
'संतविचार विषमते विरुद्ध'
वाबळे म्हणाले, 'संतांचे विचार विषमतेच्या विरोधात होते. संताचे विचार हे समता, स्वातंत्र्य, न्यायाचे आहेत. संतांचा प्रभावदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह अनेक महापुरुषांवर होता.' कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दीपक देवरे यांनी केले.





Post a Comment
0 Comments